मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार; कारवाईकडे सर्वांचे लक्ष
वणी : मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या अपूर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असल्याच्या आरोपानंतर आता या प्रकरणाला प्रशासकीय पातळीवरही गांभीर्य प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित होत असताना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात गट शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यवतमाळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असल्यास बांधकाम क्षेत्र आणि विद्यार्थ्यांसाठीचा परिसर सुरक्षित करण्यात आला आहे का, बांधकाम साहित्य अथवा इतर अपूर्ण भागांमुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का, याची अधिकृत पाहणी होणे आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच इमारतीच्या बांधकामाची परवानगी, मंजूर नकाशा, वापरासंबंधीची आवश्यक परवानगी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट यासह शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची संबंधित विभागांकडून तपासणी करण्यात आली आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
शाळेलगत बिअर शॉपी असल्याने नवा प्रश्न
या प्रकरणात शाळेच्या लगतच बिअर शॉपी असल्याचेही निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर संबंधित ठिकाणी यापूर्वीपासून शाळा सुरू होती, तर अशा परिस्थितीत मद्यविक्रीच्या दुकानाला संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक परवानगी किंवा NOC कशी मिळाली, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय असल्याने केवळ नोटीस देण्यापुरती कारवाई न करता नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यानुसार ठोस पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि पालकांना अधिकृत माहिती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
आता या तक्रारीनंतर गट शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यवतमाळ, CBSE दिल्ली आणि महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून ठोस निर्णय कधी घेणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.



















