प्रतिनिधी | नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता, स्वच्छता आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी या उद्देशाने आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायिकांसाठी नवीन आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक राहणार आहे. हॉटेल परिसर स्वच्छ ठेवणे, स्वयंपाकघरातील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नपदार्थांचे योग्य साठवण, तसेच परवान्यांचे नूतनीकरण वेळेत करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच ग्राहकांना बिल देणे, प्लास्टिकबंदीचे पालन करणे आणि शासनाच्या अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



















