वणी पोलिसांची वरली मटका जुगारावर धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
वणी | प्रतिनिधी
वणी पोलिसांनी शहरातील विविध भागात वरली मटका जुगारावर धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पहिली कारवाई नगर परिषद भाजीमंडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ करण्यात आली. या प्रकरणात अश्पाक खान अब्बास खान (वय 38, रा. मोमिनपुरा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून वरली मटक्याच्या चिट्ट्या, कार्बन पेपर, डॉट पेन आणि 1,740 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेश्राम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन सावसाकडे आहे.
दुसरी कारवाई ज्योती बारच्या गल्लीत करण्यात आली. येथे संजय शंकर गौरकार (वय 52, रा. सावरकर चौक, वणी) हा वरली मटका जुगार चालविताना आढळून आला. त्याच्याकडून मटका पट्टी बुक, कार्बन पेपर, डॉट पेन आणि 720 रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई लोकेश मसराम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.
तिसरी कारवाई ब्राम्हणी फाटा परिसरात करण्यात आली. येथे सतीश प्रभाकर जोशी (वय 57, रा. बीएसएनएल कार्यालयाजवळ, वणी) हा वरली मटका जुगार खेळविताना पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून जुगाराच्या चिट्ट्या, डॉट पेन आणि 700 रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोउपनि प्रवीण हिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.
वणी पोलिसांनी एकाच दिवशी केलेल्या सलग तीन कारवायांमुळे शहरातील बेकायदेशीर वरली मटका व्यवसायावर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्याचे स्पष्ट झाले असून अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



















