शिरपूर पोलिसांचा ड्रग्स माफियांवर मोठा घाव; मुख्य सूत्रधार नागपुरातून जेरबंद, आता वणीतील ‘मोठे मासे’ रडारवर!
वणी | प्रतिनिधी
शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्सविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून, फेब्रुवारी महिन्यात शिरपूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या ड्रग्स प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार मोहम्मद राजिक जमील अन्सारी (वय 27, रा. यशोधरा नगर, नागपूर) याला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. पुढील तपासासाठी शिरपूर पोलिसांचे विशेष पथक आरोपीला घेऊन नागपूर येथे रवाना झाले असून, ड्रग्स नेटवर्कमधील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्यात शिरपूर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर मोहम्मद अन्सारी हा फरार झाला होता. मात्र ठाणेदार संतोष मनवर यांनी त्याचा सातत्याने पाठलाग करत गोपनीय माहितीच्या आधारे 29 जून रोजी नागपूर येथून त्याला अटक केली. या कारवाईमुळे शिरपूर पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर वणी शहर व परिसरातील ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले असून, शहरालगतच्या गणेशपूर परिसरातील एका मोठ्या ड्रग्स तस्करावरही शिरपूर पोलिसांची नजर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, वणी शहरातील अनेक संशयित ड्रग्स तस्कर लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाबाबत ठाणेदार संतोष मनवर यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “वणी शहरातील अनेक ड्रग्स तस्कर आमच्या रडारवर आहेत. संपूर्ण ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ड्रग्सच्या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.”
शिरपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे आणि अटकसत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



















