मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या पेरेंट्स मीटिंगमध्ये ‘परवानगी’चा मुद्दा गाजणार? पालक शाळा प्रशासनाला जाब विचारणार!
वणी : मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरातील शाळेच्या अपूर्ण इमारतीचा आणि बांधकाम परवानगीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे. उद्या, दि. २५ ऑगस्ट रोजी याच शाळेत पेरेंट्स मीटिंग आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत शाळेच्या बांधकामाला परवानगी आहे का? यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अपूर्ण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात असल्याने पालकांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी खिडक्यांचे काम अपूर्ण असून, लिफ्टसाठी ठेवण्यात आलेला भाग उघडा असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘शाळेला परवानगी आहे का?’ या प्रश्नावर प्रशासन काय उत्तर देणार?
या प्रकरणी वणी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सदर बांधकामासाठी आवश्यक परवानगी नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आहे. तसेच इमारतीला अद्याप कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले नसल्याचा मुद्दाही समोर आला आहे.
मग परवानगी नसलेल्या आणि बांधकाम पूर्ण न झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग कसे सुरू आहेत? याचे उत्तर शाळा व्यवस्थापनाने पालकांना देणे गरजेचे आहे.
उद्याच्या पेरेंट्स मीटिंगमध्ये पालकांकडून याबाबत थेट प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असून, शाळा प्रशासन या गंभीर प्रश्नांना काय उत्तर देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकांचा सवाल : दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?
उघडे बांधकाम, अपूर्ण खिडक्या आणि लिफ्टचा उघडा भाग असताना विद्यार्थ्यांना इमारतीत बसविले जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली किंवा मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
शाळा प्रशासन? बांधकाम करणारे? की वणी नगरपालिका?
दुर्घटना झाल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आजच विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
नगरपालिकेची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात
एवढ्या मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना नगरपालिका प्रशासनाला याची माहिती कशी झाली नाही? जर बांधकामाला परवानगी नसेल तर वेळेत कारवाई का झाली नाही? नोटीस बजावली असेल तर पुढील कारवाई काय झाली? याचा खुलासा नगरपालिकेनेही करणे गरजेचे आहे.
उद्याच्या पेरेंट्स मीटिंगमध्ये पालक या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतात का आणि शाळा प्रशासन त्यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे; त्यामुळे केवळ आश्वासन नव्हे, तर अधिकृत कागदपत्रे आणि स्पष्ट उत्तर पालकांना मिळणार का? हा खरा सवाल आहे.



















