अपूर्ण व विनापरवानगी इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग! मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीचा धक्कादायक प्रकार
वणी : शहरातील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या शाळेच्या इमारतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही आणि आवश्यक परवानग्यांबाबत प्रश्नचिन्ह असतानाही याच अपूर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू असून अनेक कामे अपूर्ण असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी खिडक्यांचे काम बाकी आहे, तर लिफ्टसाठी तयार करण्यात आलेला भाग उघडा असल्याचे सांगितले जात आहे. अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांना इमारतीत बसविणे म्हणजे त्यांच्या जीविताशी खेळ करण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नगरपालिकेची परवानगीच नाही?
या प्रकरणी वणी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सदर बांधकामासाठी नगरपालिकेची आवश्यक परवानगी नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब कशी आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या इमारतीला वणी नगरपालिकेकडून अद्याप कम्प्लिशन सर्टिफिकेट (पूर्णत्व प्रमाणपत्र) देण्यात आलेले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मग बांधकाम पूर्ण न झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना वर्गासाठी बसविण्याची परवानगी कोणी दिली? शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लिफ्टचा उघडा भाग, खिडक्यांचे काम अपूर्ण
इमारतीमध्ये लिफ्टसाठी तयार करण्यात आलेला भाग उघडा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही खिडक्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विद्यार्थी खेळताना किंवा उत्सुकतेपोटी अशा उघड्या भागाजवळ गेल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखाद्या विद्यार्थ्याचा पाय घसरला किंवा एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शाळा प्रशासन की वणी नगरपालिका? हा प्रश्न आता पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालकांना माहिती असूनही गप्प का?
या शाळेत आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठविणाऱ्या पालकांनाही इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची आणि काही भाग अपूर्ण असल्याची माहिती असतानाही पालकांकडून ठोस आवाज उठविला जात नसल्याची चर्चा आहे.
मात्र, दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने आणि पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न असल्याने पालकांनीही या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
शाळेजवळ बिअर शॉपीला NOC कशी?
याशिवाय शाळेच्या लगतच बिअर शॉपी असल्याचेही निदर्शनास येत आहे. जर या ठिकाणी आधीपासून शाळा सुरू होती, तर संबंधित बिअर शॉपीला नगरपालिका प्रशासनाकडून NOC कशी मिळाली, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. शाळा आणि मद्यविक्री केंद्राच्या अंतरासह संबंधित नियमांची तपासणी करून प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
नोटीस बजावून नगरपालिका शांत?
जर सदर बांधकाम विनापरवानगी असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली असेल, तर प्रशासनाने केवळ नोटीस बजावून शांत बसणे योग्य आहे का? बांधकाम नियमबाह्य असल्याचे आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी आणि ठोस कारवाई होणे आवश्यक आहे.
शिक्षण विभागाने तातडीने पाहणी करावी
अपूर्ण आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसविले जात असल्याच्या तक्रारीची शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन शाळेची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का, अग्निसुरक्षा व इतर सुरक्षा नियमांचे पालन झाले आहे का, बांधकामाची परवानगी आहे का आणि पूर्णत्व प्रमाणपत्र का देण्यात आलेले नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आजच प्रशासनाने आणि शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर चौकशी समित्या आणि नोटिसांचा खेळ सुरू करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.



















