पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात
२० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये धडक कारवाई
पुसद प्रतिनिधि: वसीम खान
महावितरणच्या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
तक्रारदार कंत्राटदाराला ब्रेकडाऊन व मेंटेनन्सच्या सुमारे २० लाख रुपये किमतीच्या नऊ वर्क ऑर्डर देण्यात आल्या होत्या. या कामांची बिले मंजूर करून देणे तसेच भविष्यातील देयके मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या २० टक्के म्हणजे चार लाख रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर ACBची पडताळणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने ACBकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पथकाने पुसद येथील विद्युत भवन परिसरातील कार्यकारी अभियंत्यांच्या क्वार्टरमध्ये लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत चार लाख रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती ACBकडून देण्यात आली.
क्वार्टरमध्येच सापळा लाच मागणीची खात्री झाल्यानंतर ACBने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना जनार्दन चव्हाण यांना पथकाने रंगेहात पकडले.
कारवाईनंतर आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची कारवाईही करण्यात येत असल्याची माहिती आहे.
ACBच्या पथकाची कारवाई ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती घटकाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाच देऊ नये आणि तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाचे : वरील प्रकरणात आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.



















