रासा गावातील हॉटेलमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री, मटका-जुगाराचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्हतरुण पिढी नशेच्या आहारी; तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी
वणी | प्रतिनिधी
वणी तालुक्यातील रासा गावातील एका हॉटेलमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री, मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे अवैध व्यवसाय सुरू असूनही त्यांच्यावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित हॉटेलमध्ये दिवसभर मटका आणि जुगाराचा व्यवहार सुरू असतो, तर अवैध दारूचीही खुलेआम विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या अवैध धंद्यांची माहिती स्थानिक पोलिसांना असूनही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे “वणी पोलिसांची मुकसंमती आहे का, की संबंधित बिट जमादाराकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
अवैध दारू, मटका आणि जुगारामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून युवक व्यसनाधीन होत आहेत. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रासा गावातील संबंधित हॉटेलमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेले अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



















