वणीत खुलेआम अवैध धंद्यांचा सुळसुळाट? मटका, जुगार, झंडीमुंडीवर पोलिसांची मुकसंमती असल्याचा नागरिकांचा सवाल
शहरातील अनेक भागांत राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप; नव्या ठाणेदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
वणी | प्रतिनिधी
वणी शहरात अवैध मटका, जुगार आणि झंडीमुंडीचे अड्डे पुन्हा एकदा खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि काही गल्ल्या या अवैध धंद्यांचे केंद्र बनल्याचे बोलले जात असून, पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीबार गल्ली, उर्दू शाळेजवळील भाजीमंडी परिसर, दीपक चौपाटी-जत्रा मैदान, एकता नगर, सिंधी कॉलनी आदी भागांत मटका, जुगार आणि झंडीमुंडीचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच काही बिअर बारमध्येही जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, “अवैध धंद्यांना पोलिसांची मुकसंमती आहे का?”, “वणी पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला आहे का?”, “नवीन ठाणेदारांनी अवैध व्यवसायिकांना मोकळे रान दिले आहे का?”
काही नागरिकांचा आरोप आहे की, अधूनमधून टाकल्या जाणाऱ्या पोलिसांच्या धाडी या केवळ दिखाव्यासाठी असतात. धाडीनंतर काही दिवस परिस्थिती शांत राहते, मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ववत अवैध व्यवसाय सुरू होत असल्याचे सांगितले जाते.
या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसन आणि जुगाराच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाची यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित ठिकाणांची सखोल चौकशी करावी, अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



















