विद्युत खांबावरील ॲल्युमिनियम तार व मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १० गुन्हे उघडकीस, १४ लाख 73 हजारचा मुद्देमाल जप्त
वणी -प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेतातील विद्युत खांबावरील ॲल्युमिनियम तार, मोटार पंप आणि केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मुकुटबन, पारवा व वणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप, केबल व विद्युत वाहिन्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख समीर, सय्यद अली आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला ॲल्युमिनियम तार शास्त्रीनगर, वणी येथील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भंगार व्यावसायिकालाही ताब्यात घेतले.
या कारवाईत १,११० किलो अॅल्युमिनियम तार, १४ किलो तांब्याची तार, ९ मोटार पंप, चोरीसाठी वापरलेली दोन वाहने आणि वायर कटर असा एकूण १४. लाख 73 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख सतीश फुके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



















