वणीतील जैन ले-आऊटमध्ये प्रतिबंधित ‘मजा’ तंबाखू तस्करावर कथित धाड; कारवाईबाबत शहरात उलटसुलट चर्चा
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील जैन ले-आऊट परिसरात प्रतिबंधित ‘मजा’ तंबाखूची अवैध तस्करी करणाऱ्या एका संशयित तस्कराच्या घरी ५ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान कथित धाड टाकण्यात आल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. मात्र ही कारवाई नेमकी कोणत्या विभागाने केली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही वेळातच तो परत आल्याचीही चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणामुळे कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, ही धाड पोलीस विभागाने टाकली की अन्न व औषध प्रशासन विभागाने, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या कथित कारवाईची कोणत्याही शासकीय नोंदीत अथवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नोंद आढळून आलेली नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, कारवाईनंतर संबंधित प्रकरणात ‘सेटिंग’ झाल्याची चर्चा शहरात रंगत असली, तरी याबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा दुजोरा उपलब्ध झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागांनी या कथित धाडीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करून, कारवाई झाली असल्यास तिची माहिती जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


















