सीबीएसईच्या नियमांना हरताळ? वणीतील काही शाळांकडून शाळेतूनच पुस्तके खरेदीची सक्ती; पालकांची आर्थिक लूट?
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील काही सीबीएसई संलग्न खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार समोर येत आहे. बाहेरील पुस्तक विक्रेत्यांकडून किंवा एनसीईआरटीची पुस्तके उपलब्ध असतानाही पालकांना शाळेने ठरवून दिलेल्या विक्रेत्याकडून किंवा थेट शाळेतूनच पुस्तके घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
सीबीएसईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एनसीईआरटीची पुस्तके वापरण्यावर भर देण्यात आला आहे. या पुस्तकांची खरेदी केवळ शाळेतूनच करणे बंधनकारक असल्याचा कोणताही नियम नाही. पालकांना अधिकृत पुस्तक विक्रेते, ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा एनसीईआरटीच्या अधिकृत माध्यमातूनही पुस्तके खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
मात्र, वणीतील काही शाळांमध्ये महागडी पुस्तके, वर्कबुक, नोटबुक आणि इतर शैक्षणिक साहित्य एकत्रित पॅकेजच्या स्वरूपात विकले जात असल्याने पालकांवर हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चर्चा आहे. अनेक पालकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शाळा स्वतः तयार केलेले अभ्याससाहित्य किंवा पूरक पुस्तके सुचवू शकतात; मात्र विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करणे योग्य नाही. अशा तक्रारींची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग आणि सीबीएसई प्रशासनाने वणीतील संबंधित शाळांची तपासणी करून पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


















