प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाचा हल्लाबोल; 3 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त
वणी : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान शहरातील फाले लेआउट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन विभाग, यवतमाळच्या पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण 3 लाख 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मुनाल नवनाथ वेलेकर, रा. फाले लेआउट याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा व विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागाच्या पथकाने ही धाड टाकली. कारवाईदरम्यान मिळालेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
या कारवाईमुळे शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.



















