वणीत डुप्लिकेट ‘मजा’ तंबाखूचा काळाबाजार? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, बनावट उत्पादनांचा संशय
मूळ कंपनीच्या नावाने बनावट पॅकेजिंग व तंबाखू विक्री होत असल्याचा दावा; संबंधित यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी.
वणी | प्रतिनिधी
वणी शहरात ‘मजा’ ब्रँडच्या नावाने बनावट सुगंधित तंबाखू तयार करून विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्थानिक स्तरावर डुप्लिकेट तंबाखू तयार करून तो मूळ कंपनीच्या नावाच्या पॅकेटमध्ये भरून बाजारात विकला जात असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून मूळ कंपनीचीही फसवणूक होत असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मजा’ कंपनीच्या नावाचे पॅकेट नागपूर येथे छापले जात असल्याचा आरोप आहे. ही रिकामी पॅकेट वणी शहरात दोन ट्रान्सपोर्ट आहे त्या दोन ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वणी येथे आणली जातात. त्यानंतर त्यामध्ये स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेला सुगंधित तंबाखू भरून बाजारात विक्रीसाठी पाठविला जात असल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा बनावट तंबाखू केमिकलचा वापर करून तयार केला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो सेवन करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक किराणा दुकाने व पानटपऱ्यांवर हे पाऊच उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी ते फक्त ओळखीच्या ग्राहकांनाच विकले जात असल्याची चर्चा आहे.
याशिवाय, ‘मजा’ तंबाखूचे रिकामे डबे पानटपऱ्यांवरून ₹100 ते ₹120 दराने खरेदी करून त्यामध्ये बनावट तंबाखू भरून पुन्हा बाजारात विकला जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ कंपनीच्या ब्रँडचा गैरवापर करून मोठा आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रकार सुरू असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाला याची माहिती नाही की माहिती असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अन्न व औषध प्रशासन, पोलिस विभाग, जीएसटी विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.


















