वणीतही ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; शिवसेना (उबाठा)चे नेते सुनील कातकडे शिवसेनेच्या वाटेवर?
वणी | आबीद हुसेन
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असतानाच, वणी शहरातही अशाच चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते तथा चिखलगावचे उपसरपंच सुनील कातकडे यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या खासदार संजय देशमुख यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात सुनील कातकडे यांनीही हजेरी लावल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, वणीत राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी शिवसेना (उबाठा)तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात सुनील कातकडे अनुपस्थित राहिल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या आंदोलनात त्यांची गैरहजेरी नेमकी कशामुळे होती, याबाबत विविध स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, सुनील कातकडे यांनी पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते खरोखरच भाजप किंवा शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर आहेत की या केवळ राजकीय चर्चाच आहेत, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र वणीच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच रंगली आहे.


















