वणीच्या पत्रकारितेवर शोककळा; ज्येष्ठ पत्रकार प्रविण शर्मा यांचे दुःखद निधन
वणी | प्रतिनिधी
वणी येथील ज्येष्ठ पत्रकार, न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा साप्ताहिक मुक्त ललकारचे संपादक प्रविण दिवानचंद शर्मा (वय ४८) यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वणीतील पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्या तसेच त्यांना लकव्याचा झटकाही आला होता. प्रारंभी त्यांच्यावर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.प्रविण शर्मा यांनी अनेक वर्षे निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राने एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील पत्रकार गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार रोजी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनसह विविध पत्रकार संघटना आणि सामाजिक संस्थांनी दिवंगत प्रविण शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.


















