ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे तसेच राज्यभरातील खाद्य व्यवसायांमध्ये अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई आणि जनजागृतीला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार (२५ जून) रोजी अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांच्या वतीने वणी येथे हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत असलेल्या नियमांची सविस्तर माहिती दिली. अन्न तयार करताना स्वच्छता राखणे, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक, वैध परवाना धारण करणे, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, दर्जेदार कच्चा माल वापरणे तसेच ग्राहकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून देणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांनी अन्न स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि शासनाने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस अन्न व औषध प्रशासन, यवतमाळचे अधिकारी तसेच वणी शहर व परिसरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि ढाबा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















