कोळसा वाहतुकीदरम्यान ई-वे बिलाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर प्रकार वणीतील लाल पुलिया परिसरात समोर आला असून, यामुळे जीएसटी चोरीचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड परिसरातील मकर डोकरा कोळसा खाणीतून संबंधित ट्रक ३१ जुलै रोजी कोळसा भरून रवाना झाला होता. मात्र, तो २ ऑगस्ट रोजी दुपारी वणी येथील लाल पुलिया परिसरात पोहोचला. त्यावेळी एका जागरूक नागरिकाने ट्रक थांबवून चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. चालकाकडे त्या वेळी ई-वे बिल उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर चालकाने फोन केल्यानंतर दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी ई-वे बिल तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित नागरिकाने तातडीने 112 आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कागदपत्रांची पाहणी केली. मात्र, ई-वे बिल नेमके केव्हा तयार झाले, ते वाहन रवाना होण्यापूर्वीचे आहे की नंतरचे, याची सखोल पडताळणी न झाल्याने वाहन सोडण्यात आल्याची माहिती आहे.
नियमांनुसार, ज्या ठिकाणाहून माल भरून वाहन रवाना होते, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी ई-वे बिल तयार करणे बंधनकारक आहे. म्हणजेच, ३१ जुलै रोजी मकर डोकरा कोळसा खाणीतून ट्रक निघत असतानाच ई-वे बिल तयार होणे आवश्यक होते. दोन दिवसांनी, वाहन वणी येथे आल्यानंतर **२ ऑगस्ट रोजी दुपारी १२:५७ वाजता ई-वे बिल तयार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.
या प्रकारामुळे कोळसा वाहतुकीत ई-वे बिलाचा गैरवापर करून शासनाचा जीएसटी महसूल बुडविण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्य जीएसटी विभाग, वाणिज्य कर विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(टीप : हे वृत्त उपलब्ध माहिती व स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या दाव्यांवर आधारित असून, संबंधित विभागाच्या अधिकृत चौकशीनंतरच अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होईल.)



















